ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरात गावठी मोहाची दारू गाळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

२.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने अवैध गावठी मोहाची दारू गाळणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹२,४२,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग सुरू असताना रेल्वे पटरीलगत टिनाच्या शेडमध्ये, आनंद नगर (वर्धा) येथे मंगेश परतेकी हा गावठी मोहाची दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष पोलीस पथकाने छापा टाकला.

यावेळी आरोपी तीन चुलींवर लोखंडी ड्रम ठेवून जर्मन भट्टीतून गावठी मोहाची दारू तयार करताना दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र रेल्वे पटरीजवळील झोपडपट्टीतील गल्लीबोळांचा फायदा घेत आरोपी पसार झाला.

घटनास्थळाची पंचनामा करून पाहणी केली असता ₹२,४२,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य नष्ट करण्यात आले. फरार आरोपी मंगेश परतेकी (रा. वर्धा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (ई), (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चातारकर यांच्या निर्देशानुसार दारूबंदी पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार सहाराय चांदोरे, सहायक पोलीस हवालदार सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार मनोज कापुरे, नवनीत वानखेडे आणि उमेश कुंभरे यांनी केली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये