Politicsग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भद्रावतीत काँग्रेसचे धरणे आंदोलन व मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरणवादी व समाजसेवक डॉ. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भद्रावती शहर व तालुका काँग्रेस समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. गांधी चौकात धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या कथित शिक्षण धोरणाविरोधात तसेच विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे अभिवादन करून जुना बसस्थानक परिसरात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या डॉ. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या लढ्यात काँग्रेस पक्ष कायम त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही देण्यात आली.

याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष भूपेश कायरकर यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. अन्यथा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.

या आंदोलनात काँग्रेस नेते प्रवीण काकडे, माजी शहराध्यक्ष सूरज गावंडे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते धर्मेंद्र हवेलीकर, तालुकाध्यक्ष सुमित मुडेवार, शहराध्यक्ष भूपेश कायरकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा नगरसेवक अनिल पडोले, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष संगीत पाटील, सेवादल ब्लॉक अध्यक्ष मांडवकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष गोरू थेम, विमुक्त जाती-भटक्या जाती विभागाचे अध्यक्ष सचिन पचारे, आदिवासी काँग्रेस सेलचे अध्यक्ष जितेंद्र मरस्कोल्हे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बाबू शेख, नगरसेविका सरिता सुर, नगरसेवक प्रथम गेडाम, नगरसेविका पल्लवी तामगाडगे, उषा जाधव, कल्पना भुसारी, सीमा पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये