वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; सातारा भोसले परिसरात दहशत
वन विभागाकडून मदतीची प्रक्रिया सुरू; वारसाला नोकरीचा प्रस्ताव असल्याची चर्चा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा :-तालुक्यातील सातारा भोसले येथील एफडीसीएम कक्ष क्रमांक ४१ मध्ये गुरूवारी दि.२३ जुलैला दुपारी एक वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात उष्टू वारलू पोरेते (वय ५५, रा. सातारा भोसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर दुसरा गुराखी निळकंठ पेंदोर वय ३७ रा.सातारा भोसले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एफडिसीएमच्या कक्ष क्र.४१ जंगल परिसरात उष्टू वारलू पोरेते व निळकंठ पेंदोर हे दोघे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात उष्टू पोरेते यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या निळकंठ पेंदोर यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविण्यात यशस्वी झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण सोनोणे व त्यांच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मृतक उष्टू पोरेते यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व गुरे चारण्यावर अवलंबून असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



