ऑटो-रिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी योजनेची माहिती
वर्धा RTO कार्यालयाचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ऑटो-रिक्षा व मिटर टॅक्सी चालक-परवानाधारकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी योजना’ अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ अंतर्गत राबविण्यात येत असून, चालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत चालकांना जीवन विमा व अपघात विमा, आरोग्य विषयक लाभ, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास योजना तसेच इतर विविध कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी चालकांनी वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अर्ज ऑनलाइन पद्धतीने संबंधित संकेतस्थळावर भरता येणार असून, नोंदणी शुल्क व वार्षिक सभासद शुल्कही निश्चित करण्यात आले आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा यांनी पात्र ऑटो-रिक्षा व मिटर टॅक्सी चालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.



