ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी केंद्राची मागणी

गर्भवती व स्तनदा मातांची गैरसोय थांबवा - नागरिकांची जोरदार मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात अद्याप अत्याधुनिक सोनोग्राफी केंद्र नसल्याने गर्भवती महिला, स्तनदा माता आणि इतर रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना राजुरा, गडचांदूर, चंद्रपूरसह इतर शहरांमध्ये जावे लागते.यामुळे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने जिवती ग्रामीण रुग्णालयात तातडीने अत्याधुनिक सोनोग्राफी केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

                  सोनोग्राफी ही गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गर्भातील बाळाची वाढ, आईच्या आरोग्याची स्थिती आणि संभाव्य गुंतागुंतीचे वेळेवर निदान यासाठी ही सुविधा आवश्यक आहे. मात्र जिवती येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून जिल्हास्तरीय शासकीय किंवा खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाचा मोठा अपव्यय होत आहे.जिवती तालुका हा दुर्गम आदिवासी भाग असल्याने येथील बहुतेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयात वारंवार सोनोग्राफी करणे अनेकांना परवडत नाही. परिणामी, काही महिलांना वेळेवर तपासणी करता येत नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि गर्भातील बाळाच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते.शासनाने मातृ-बाल आरोग्य सुधारण्यासाठी अनेक योजना राबवल्या असतानाही, ग्रामीण रुग्णालयात मूलभूत निदान सुविधा नसल्याने या योजनांचा लाभ दुर्गम भागातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. तालुका किंवा जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी प्रचंड गर्दी असते. तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते आणि अनेकदा दिवसभर रांगेत उभे राहूनही तपासणी होत नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान नियमित सोनोग्राफी केल्यास गंभीर गुंतागुंती वेळेवर ओळखता येतात आणि योग्य उपचार शक्य होतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.जिवती ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन,प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून ही सेवा तातडीने सुरू केल्यास तालुक्यातील शेकडो गावांतील हजारो महिलांना आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

यामुळे वेळेवर निदान,सुरक्षित मातृत्व आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल,जिवती तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन जिवती ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी केंद्र सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये