ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरोली शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; तिघे ताब्यात, तिघे फरार 

 'एक्का बादशहा' जुगारावर पोलिसांचा छापा; रोख रक्कम जप्त, गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा पोलिसांनी गिरोली बुद्रुक शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ‘एक्का बादशहा’ नावाचा हार-जीतचा जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला असून, अन्य तिघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गिरोली बुद्रुक शिवारात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान राजू साहेबराव लोखंडे (वय ३४, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा), भरत अवचित जाधव (वय ४०, रा. काचनेरा, ता. जाफ्राबाद) यांच्यासह अन्य आरोपी जुगार खेळताना आढळून आले. तर राजू लक्ष्मण नागरे (रा. राजीवळखेड), मच्छींद्र केसापुरे आणि कैलास शिवरकर (दोघेही रा. देऊळगाव राजा) हे घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून १ हजार १५० रुपये, तर जुगाराच्या डावावर ठेवलेले १ हजार ४५० रुपये असा एकूण २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, तसेच ५२ पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये