ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाशिवलिंग मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी अमृता फडणवीस चंद्रपुरात

आ. जोरगेवार यांच्या पूढाकारातून ८ सप्टेंबरला भव्य धार्मिक सोहळा, कावड यात्रा, महारुद्राभिषेक व महाप्रसादाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुरातन महाशिवलिंग म्हणून ओळखल्या जाणार्या लालपेठ कॉलरी येथील विशाल महाशिवलिंग मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित भव्य धार्मिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस चंद्रपुरात उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार्या या सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विशाल महाशिवलिंग मंदिर सेवा समिती तथा सर्व मित्र संघर्ष क्रीडा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे. पुरातन धार्मिक वारशाचे जतन करण्यासोबतच या परिसराचा सर्वांगीण विकास करून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी केला आहे.

  लालपेठ कॉलरी येथील विशाल महाशिवलिंगाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या पुरातन स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारापुरतेच मर्यादित न राहता भविष्यात या परिसराचा नियोजनबद्ध विकास करून येथे येणार्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या परिसराला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याच्या दिशेनेही हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

            जीर्णोद्धारानिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्याला अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुपारी ३ वाजता एचपी गॅस गोडावून येथून भव्य कावड यात्रेला सुरुवात होणार असून, लालपेठ कॉलरी होत ही यात्रा विशाल महाशिवलिंग मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर शिवलिंग पूजन व महारुद्राभिषेकाचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

             सायंकाळी ६ वाजता आरती व महाकाल शृंगार दर्शनाचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ७ वाजल्यापासून विशाल महाशिवलिंग मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

 लालपेठ कॉलरी येथील पुरातन महाशिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करून या धार्मिक स्थळाला नवी झळाळी देण्यासोबतच परिसरात भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमदार किशोर जोरगेवार यांचा संकल्प आहे. त्यामुळे आगामी काळात हे स्थळ धार्मिक श्रद्धेसोबतच चंद्रपूरच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये