अभिषेक माध्यमिक विद्यालयात दहीहंडी व शिक्षक दिन उत्साहात साजरा
१३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील चिखली (खुर्द) येथील अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी तोडफोड मडकी फोड व दहीहंडी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक कु. मेघना रविकांत कांबळे, द्वितीय क्रमांक कु. पूनम केदासे, तर तृतीय क्रमांक अजय बोडगीर यांनी पटकावला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकार्जुन पा. सुरनर होते, तर उद्घाटक म्हणून नागोराव पा. बोडगीर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचांदूर शहराचे नगराध्यक्ष निलेश ताजणे, तसेच सुरेश केंद्रे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संतोष मोतेवाड, खंडू पाटील सलगर, बालाजी पाटील भुते, सुयोग डोंगरे, कुणाल पारखी, शिवराज जवाले व फारुख शेख यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक निलेश ताजणे यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, पेन तसेच इतर शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी गोडधोड म्हणून बिस्किटांचे वितरण करण्यात आले.
मार्गदर्शन करताना ताजणे यांनी विद्यार्थीदशेत अंगीकारावयाच्या विविध गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंगद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन शंकर गेडाम यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन व तसेच आभार प्रदर्शना सुभाष राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण लाभले.



