वाघाच्या हल्ल्यात गायीचा शौर्यपूर्ण संघर्ष
देवाडा खुर्द येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यातून एका गायीने शौर्याने प्रतिकार करत आपली सुटका करून घेतल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाडा खुर्द येथील श्री विठ्ठल मोगल यांची गाय नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरायला गेली होती. त्याचवेळी अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला केला. मात्र गायीने घाबरून न जाता जोरदार प्रतिकार केला. या संघर्षात गाय जखमी झाली असली तरी तिने वाघाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.
या घटनेमुळे देवाडा खुर्द व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या शेतात काम करणारे शेतकरी व जनावरे चारणारे नागरिक अधिक सतर्क झाले आहेत.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून परिसरात गस्त वाढविण्याची तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



