ताज्या घडामोडी

शिक्षकांचा सन्मान अन् गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन शिक्षक दिन साजरा

रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिक्षक दिनानिमित्त सन्मान सोहळा; इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचे संपूर्ण शुल्क ट्रस्टकडून तथा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक आधार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.

भद्रावती :_ शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून स्वर्गीय श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे करण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारातून आणि ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पाटील आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले होते. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. खासदार प्रतिभाताई धानोरकर, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, डीवायएसपी सचिन केंद्रे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकरराव कडू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, भाऊराव खूटेमाटे, नगरसेविका वृषालीताई पांढरे, नगरसेविका कविताताई सावनकर, पवारताई यांच्यासह अनेक मान्यवर, सेवानिवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

*३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार*

रविंद्र शिंदे यांनी आपल्या मनोगतात ट्रस्टच्या २५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, दिव्यांग कल्याण, कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती अशा विविध क्षेत्रांत ट्रस्ट कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शन, कैलासवासी म. ना. पावडे क्रीडा स्पर्धा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना तसेच अनाथांची माई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अशा विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजनेअंतर्गत ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून, त्यांना लॅपटॉपसह विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच उपक्रमांतर्गत कार्तिक गजानन खंडाळकर या विद्यार्थ्याच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रवेशाचे संपूर्ण शुल्क ट्रस्टच्या वतीने भरण्यात आले. याशिवाय वंश गजानन टोंगे, दक्ष हरीष करमरकर, सानवी सुधीर नगराळे, तनवी सुनिल लोणारे, गुंजन प्रदीप पिंपळकर, नेहा राजू अंबोरे, देवांश अनिल नागपूरे, प्रणित अनिल फाले, दिव्यांश देवानंद येरेमे, वेदांत सुधीर नगराळे, होमेश्वरी सुरेंद्र घुगुल, शर्वी लक्ष्मीकांत मांडवकर, अवन्या मलखानसिंह सेंगर, सिद्धांत उत्तम करमनकर, सुहाणी किशोर घरत, रुद्र निलेश उपरे आणि गौरी संदीप वाघाडे या विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

*‘शिक्षक कधीच माजी होत नाही’*

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ओझे हलके करण्यासाठी त्यांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी मदत करण्याच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले तथा कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता ट्रस्ट काम करीत असल्याचे बोलून दाखवले.

माजी मंत्री हंसराज अहिर यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य अनुकरणीय असल्याचे सांगितले शैक्षणिक व सामाजिक जीवनात काम करत असताना शिक्षकांचा फार मोठे योगदान असून आधुनिक भारत घडविण्याचे काम शिक्षकवृद करतात शिक्षक दिना निमित्य त्यांना शुभेच्छा दिल्या.

आमदार सुधाकर अडबाले यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “इतर क्षेत्रातील व्यक्तींना माजी म्हटले जाऊ शकते; मात्र शिक्षक कधीच माजी होत नाहीत, शिक्षक कायम शिक्षकच असतात,” असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले.

अपर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे यांनी समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

दरम्यान, उपस्थित शिक्षकांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सकारात्मकतेने लक्ष देऊन बँकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न तातडीने मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार आणि गरजूंसाठी मदतीचा हात या त्रिसूत्रीतून रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा सेवाभावी प्रवास सुरू असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये