ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोखंडी अँगल बाहेर काढून वाहतूक महागात

एसटी बसच्या पाच काचा फुटल्या, गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  निष्काळजी वाहतुकीचा फटका; पिकअपवरील लोखंडी अँगलमुळे एसटी बसचे २५ हजारांचे नुकसान

 पिकअप वाहनातून कोणतीही सुरक्षितता न बाळगता बाहेर आलेले लोखंडी अँगल वाहतूक केल्यामुळे एसटी बसच्या समोरील आणि बाजूच्या काचा फुटून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना देऊळगाव राजा शहरालगत गजानन नगर परिसरातील उमेश अॅग्रोजवळील कटऑफ येथे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप दगडुबा म्हस्के (वय ४२, रा. जाफ्राबाद, जि. जालना) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे चालक असून त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या दरम्यान ते एमएच-२० बीएल-२५६१ क्रमांकाची एसटी बस घेऊन जात असताना गजानन नगरजवळील उमेश अॅग्रोजवळ कटऑफ परिसरात समोरून येणाऱ्या एमएच-०४ जेके-५३६४ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून सुमारे पाच ते सात फूट लांबीचे लोखंडी अँगल वाहनाच्या बाहेर आलेले होते. संबंधित चालकाने अशा धोकादायक वाहतुकीबाबत कोणतीही खबरदारी अथवा सुरक्षिततेची उपाययोजना केली नव्हती.

या बाहेर आलेल्या लोखंडी अँगलचा एसटी बसला जोरदार धक्का बसल्याने बसची समोरील दर्शनी काच तसेच मागील बाजूच्या प्रवासी खिडक्यांच्या चार काचा फुटल्या. या घटनेत एसटी महामंडळाचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणी सोपान कृष्णा गाडेकर (रा. वाघुळ, जि. जालना) याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ व ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद १९ जुलै रोजी सकाळी १०.५१ वाजता नोंदविण्यात आली. दाखल अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जायभाये यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली असून, निष्काळजीपणे धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये