कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तारण योजनेत शेतकऱ्यांना “लॉटरी”
धानाला ४,०६० रुपयांचा भाव _१६३ शेतकऱ्यांना लाभ ; _प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा अतिरिक्त फायदा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरीतर्फे राबविण्यात आलेल्या शेतमाल तारण योजनेला यंदा मोठे यश मिळाले आहे. या योजनेमुळे तालुक्यातील १६३ शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला असून, धानाला बाजारभावापेक्षा विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आहे.
तालुक्यातील घामणगाव येथील शेतकरी गुलाबराव यादव फुलके यांच्या श्रीराम प्रजातीच्या धानाला गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतिक्विंटल ४,०६० रुपये भाव मिळाला. हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजवरच्या लिलावातील सर्वोच्च विक्री दर असल्याचे समितीने सांगितले. तसेच श्री १०१, जी-९, सुपर श्रीराम, पन्ना आदी धान वाणांनाही ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
धान उत्पादनानंतर सुरुवातीला बाजारात केवळ २,५०० ते २,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. मात्र, यंदा सुमारे ८ हजार क्विंटल धान तारण योजनेत जमा करण्यात आले. बाजार समितीने धान ठेवताच शेतकऱ्यांना ७५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यानंतर झालेल्या लिलावात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल घुडसे, उपसभापती स्वप्नील अनुमुलवार, संचालक महेंद्रसिंह चंदेल, निलेश पुलगमकर, गणपती चौधरी, सुहास माडूरवार, अशोक रेचणकर, रितेश वेगीनवार, निलेश संगमवार, समीर गिमगडे, चंद्रजित गव्हारे, संदीप पोरकर, देवीदास सातपुते, संजना आम्मवार, विजय पेरकावार, नारायण बायडकर, संतोष बंडावार, प्रमिला चनेकर यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे यावर्षी शेतमाल तारण योजना यशस्वी झाली. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती इंद्रपाल घुडसे व सचिव अनिल चौधरी यांनी केले.
प्रतिक्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचा फायदा तारण योजनेतील लिलावामुळे १६३ शेतकऱ्यांना बाजारातील नियमित दरापेक्षा प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा अतिरिक्त फायदा झाला. गोंडपिपरीसह मूल, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी येथील व्यापाऱ्यांनी या लिलावातून धान खरेदी केले. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी तारण योजना प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
*लिलावापूर्वीच मिळाली ७५ टक्के अग्रीम रक्कम*
कमी बाजारभावाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने धान ठेवताच ७५ टक्के अग्रीम रक्कम उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळाली. त्यानंतर लिलावात चांगला विक्री दर मिळाल्याने उत्पादनातूनही अधिक उत्पन्न मिळाले. बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेची प्रतीक्षा करून अधिक भाव मिळविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.



