ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षण समस्यांचे निराकरण त्वरित करा – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

सिंदेवाही पंचायत समितीच्या आमसभेत अधिकाऱ्यांना निर्देश

चांदा ब्लास्ट
 ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण वेळेत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला. सिंदेवाही पंचायत समितीच्या सर्वसाधारण आमसभेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
पंचायत समिती सिंदेवाहीच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेस अती.मुख्य कार्यपालन अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा ग्राम विकास यंत्रणा अधिकारी वंजारी,सिंदेवाही तहसीलदार विजया झाडे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे,तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, पोलिस निरीक्षक कांचन पांडे, बाबुराव गेडाम, माजी सभापती विरेंद्र जयस्वाल,माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, माजी प. स. सदस्य राहुल पोरेडीवार, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पिडवार, सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडणे, नगरसेवक पंकज नन्नेवार यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते आ. वडेट्टीवार यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य केंद्रांची स्थिती, शाळांमधील शिक्षकांची कमतरता, अंगणवाडी सेवा, सिंचन, शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील तर ते प्रशासनाचे अपयश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहतील यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होणार नाही, शिक्षकांची रिक्त पदे, शाळांतील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणत्याही योजनेत दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“जनतेच्या प्रश्नांची उत्तरे कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसली पाहिजेत. अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत, त्यामुळे प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून ग्रामीण भागातील समस्या तातडीने निकाली काढाव्यात,” असे स्पष्ट निर्देश आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.
या बैठकीस पंचायत समितीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विकासाच्या कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांनी निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये