ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूच्या नशेत विहिरीत मारली उडी; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

विठ्ठलवाडा येथे थरारक घटना ; अर्धा तास सुरू होती जीव वाचविण्याची धडपड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे शनिवारी (दि. १८) दारूच्या नशेत एका व्यक्तीने घरासमोरील विहिरीत उडी मारल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले. या घटनेची गावात दिवसभर चर्चा रंगली.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडा येथील बंडू मडावी यांनी दारूच्या नशेत आपल्या घरासमोरील विहिरीत अचानक उडी मारली. ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणातच परिसरात मोठी गर्दी जमली आणि मडावी यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.

सुरुवातीला ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने चारपाई विहिरीत सोडली, जेणेकरून बंडू मडावी त्यावर बसून वर येऊ शकतील. मात्र त्यांनी नशेच्या अवस्थेत ती चारपाई पायाने ढकलून दिली. त्यामुळे उपस्थित नागरिकांची चिंता अधिक वाढली.

यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा दोरी विहिरीत सोडून त्यांना ती पकडण्याचे आवाहन केले. जवळपास अर्धा तास समजावून सांगितल्यानंतर अखेर बंडू मडावी यांनी दोरी पकडली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकजुटीने दोरी ओढत त्यांना सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले. त्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या प्रसंगात ग्रामस्थांनी दाखविलेले धैर्य, तत्परता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे मोठी जीवितहानी टळली. जर नागरिकांनी वेळेवर धाव घेतली नसती, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

या घटनेनंतर गावात दारूच्या व्यसनामुळे घडणाऱ्या अशा धोकादायक प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येत असून, व्यसनाधीन व्यक्तींनी स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करून अशा प्रवृत्तींपासून दूर राहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये