ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा त्याग आणि शौर्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – आ. किशोर जोरगेवार

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना शहीददिनी विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांनी दिलेला लढा, त्यांचे अतुलनीय शौर्य, त्याग आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती आणि आदिवासी कृती समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या बलिदान (शहीद) दिनानिमित्त २१ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्मारक येथे आदरांजली व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीताताई खांडेकर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे विलास मसराम, गणेश गेडाम, भैय्याजी उईके, नगरसेवक जितेश कुळमेथे, कमलेश आत्राम, विठ्ठल कुमरे, भोला मडावी, राजेंद्र दुर्वे, शंकर उईके, शाम गेडाम, दिवाकर मेश्राम, नथ्थू गेडाम, वीरेंद्र कुमरे आणि अनिल सिडाम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या संघर्षातून स्वाभिमान, धैर्य आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा यांचे दर्शन घडते. त्यांचे बलिदान हा केवळ इतिहासाचा भाग नसून, अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारा विचार आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे आणि पुढील पिढीला त्यांच्या पराक्रमाची ओळख करून देणे आवश्यक आहे.

आदिवासी समाजाचा इतिहास संघर्ष, शौर्य आणि त्यागाच्या गौरवशाली परंपरेने समृद्ध आहे. या परंपरेतील क्रांतिकारकांचे योगदान समाजासमोर आणणे, त्यांच्या स्मृती जतन करणे आणि त्यांच्या विचारांना व्यापक स्वरूप देणे महत्त्वाचे आहे, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये