वरोऱ्यात आझाद हिंद सेनेचा ८३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
आशिष रैच, राजुरा.
जय हिंद सैनिक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने वरोरा येथील शहीद योगेश डाहुले चौकात आझाद हिंद सेनेचा ८३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अर्चना ठाकरे होत्या.

व्यासपीठावर माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे, माजी सैनिक मनोज जीवतोडे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. संदीप पारखी आणि जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने उपस्थित होते.
नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जाज्वल्य देशभक्तीचा आणि संघर्षमय जीवनकार्याचा आढावा घेतला. नेताजींच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
“आझाद हिंद सेनेच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचा सन्मान जय हिंद सैनिक संस्थेच्या माध्यमातून मला मिळाला, हे माझे सौभाग्य आहे. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
लेफ्टनंट डॉ. संदीप पारखी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!” हा नेताजींचा नारा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे आवाहन होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा भारतीय इतिहासात सदैव अजरामर राहील, असे त्यांनी सांगितले.
नेताजींच्या विचारांचे स्मरण करून देणारा आणि नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागविणारा जय हिंद सैनिक संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी जय हिंद सैनिक संस्थेवर रचलेल्या कवितेचे वाचन केले.
जय हिंद सैनिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे यांनी सांगितले. देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकात जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
“आजचा दिवस केवळ एका ऐतिहासिक संघटनेच्या स्थापनेचा दिवस नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या वीरांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशभक्तीची आठवण करून देणारा दिवस आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध मागण्या मांडल्या. टोकियो येथील रेनकोजी बौद्ध विहारात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी असल्याचे सांगितले जाते. या अस्थींची सत्यता पडताळण्यासाठी भारत सरकारने त्या भारतात आणून डीएनए चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नेताजींची जयंती सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरी करणे अनिवार्य करावे तसेच आझाद हिंद सेनेचा २१ ऑक्टोबर हा स्थापना दिन दरवर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नेताजींना मानवंदना देऊन राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, माजी सैनिक मनोज जीवतोडे, सुरेश बोभाटे आणि लेफ्टनंट डॉ. संदीप पारखी यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरव करण्यात आला.
तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे माजी प्राचार्य बळवंत शेलवटकर, विजय पिसे, माजी शिक्षक लक्ष्मण पराते, शेतकरी किशोर देवडे, सामाजिक कार्यकर्ते छोटुभाई शेख, बंडू देऊळकर, राहुल देवडे, उद्योजक मधुसूदन टिपले,तुळशीदास लांजेवार आणि व्यावसायिक सतीश सारडा यांचाही सत्कार करण्यात आला.
जय हिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक चंद्रमोहन बोस, राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने आणि राष्ट्रीय सचिव जनार्दन जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले, तर संस्थेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पोहाणे यांनी आभार मानले. यावेळी जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सागर कोहळे, पदाधिकारी विजय वैद्य, गजानन उमरे, अशोक बावणे, सामाजिक कार्यकर्ते संजू राम, तुषार मर्दाने आदींसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.



