ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज!

आलापल्ली येथील वर्षावास प्रवचनमालिकेत सूर्यभान डोंगरे यांचे प्रतिपादन ; शिक्षण, समता, बंधुता आणि महिला सक्षमीकरणावर भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आलापल्ली येथील संघमित्रा बौद्ध विहारात वर्षावास प्रवचनमालिकेतील ‘पुष्प अठरावे’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी?’ या विषयावर मार्गदर्शन करताना सूर्यभान डोंगरे यांनी धम्मक्रांतीचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण, प्रज्ञा, समता, बंधुता, नैतिक आचरण आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून व्यापक परिवर्तन घडवून आणण्याची गरज प्रतिपादित केली.

भारतीय बौद्ध महासभा आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा इतिहास, बौद्ध तत्त्वज्ञान, वर्तमानातील सामाजिक आव्हाने आणि धम्माच्या प्रसारासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करून ते वर्तमानातील सामाजिक प्रश्नांशी जोडणे आवश्यक आहे. केवळ जयंती, उत्सव किंवा कार्यक्रमापुरते महापुरुषांचे विचार मर्यादित न ठेवता त्यांच्या तत्वज्ञानानुसार सामाजिक बांधिलकी जपणे महत्वाचे असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आलापल्ली, भारतीय बौद्ध महासभा गडचिरोली (दक्षिण,उत्तर), महिला समिती आलापल्ली, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी, महामाया महिला मंडळ आलापल्ली आणि बहुउद्देशीय महिला मंडळ आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार बुद्धवंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण, भीमस्मरण आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. दुर्गम सर यांनी केले तर भीमगीतांचे सादरीकरण आणि आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वर्षावास प्रवचनमलिकेतील या कार्यक्रमात आलापल्ली व अहेरी परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. “नमो बुद्धाय! जय भीम!”च्या जयघोषात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

*धम्मक्रांती केवळ धर्मांतर नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ*

मार्गदर्शन करताना सूर्यभान डोंगरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा नवा मार्ग दाखविला. ही धम्मक्रांती केवळ धर्मांतरापुरती मर्यादित नसून माणसाच्या विचारांमध्ये, आचरणामध्ये आणि सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणणारी व्यापक प्रक्रिया आहे. धम्मक्रांतीचा मूळ उद्देश समाजातील विषमता दूर करणे, विवेकवादी विचारांना प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे हा आहे. त्यामुळे धम्माचे तत्त्वज्ञान केवळ प्रवचनांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथातील विचारांवर प्रकाश*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील विचारांचा संदर्भ देत सूर्यभान डोंगरे यांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची सामाजिक उपयुक्तता विशद केली. बुद्धांचा धम्म हा विवेक, प्रज्ञा, करुणा आणि नैतिक आचरणावर आधारित असल्याचे सांगत समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांपासून दूर राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अशोक विजयादशमीचे ऐतिहासिक महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीची पार्श्वभूमी स्पष्ट करताना, नव्या पिढीपर्यंत हा परिवर्तनवादी विचार पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजना?*

धम्मक्रांतीला व्यापक स्वरूप देण्यासाठी समाजाने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगताना सूर्यभान डोंगरे यांनी विविध मुद्द्यांवर भर दिला.

*शिक्षणाला प्राधान्य* : समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाचा प्रसार करून नव्या पिढीमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.

*तरुणांचा सक्रिय सहभाग*: धम्माचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तनवादी तत्त्वज्ञान तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

*महिला सक्षमीकरण* : महिलांना शिक्षण, समान संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे.

*अंधश्रद्धा निर्मूलन* : समाजात विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथांविरुद्ध जनजागृती करणे गरजेचे आहे.

*जातिभेद निर्मूलन* : जातीय विषमता दूर करून समता आणि बंधुतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

*नैतिक आचरण* : बुद्धांच्या शिकवणीतील नैतिक मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारून सामाजिक जबाबदारीचे भान जपणे महत्त्वाचे आहे.

*सामाजिक सेवा आणि संघटन*: समाजातील वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे काम करून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणे गरजेचे आहे.

*जागतिक स्तरावर धम्माचा प्रसार* : बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

*विचारमंथनातून सामाजिक प्रश्नांचा वेध*

कार्यक्रमात यशवंत मनोहर यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली?’ या प्रबंधासह ‘अस्पृश्य कोण होते?’ आणि ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयांतील विचारांचाही संदर्भ देण्यात आला. या विषयांच्या माध्यमातून सामाजिक विषमता, अस्पृश्यतेचा इतिहास, बौद्ध विचारधारा आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन यांवर विचारमंथन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये