ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुधाकर कोहळे यांना विजयी करा – ना . चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रपूर महानगर भाजपच्या पदवीधर संवाद मेळाव्यात महसूलमंत्र्यांचे आवाहन; आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीत पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने बुधवारी महेश भवन येथे आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पदवीधरांच्या प्रश्नांबरोबरच विरोधकांच्या भूमिकेवरही टीका केली.

   यावेळी पालकमंत्री डॉ. प्रा अशोक वुईके, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रभारी अर्चना डेहनकर, आमदार राजु तोडसाम, माजी आमदार अनिल सोले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते अरुण तिखे, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सचिव उल्हास करपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, मनपा गटनेता चंद्रशेखर शेट्टी, मोहम्मद जिलानी, महामंत्री सविता दंढारे, नामदेव डाहुले, श्याम कनकम, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, घुघुस नगर परिषद गटनेता मीना मोरपाका, नगरसेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळे,आशिष मासिरकर, नगरसेविका सविता कांबळे, शीतल गुरनुले, पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, आशा देशमुख, ज्योती जीवने, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, सारिका संदूरकर, स्वप्नील डुकरे, सिनेत सदस्य नीलेश बेलखेडे आदींची उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले की, राज्यातील पदवीधरांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न असून, ते शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सक्षम आणि सरकारशी समन्वय साधणारा प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारांनी मतदान करताना कोणतीही चूक करू नये. चुकीच्या उमेदवाराला दिलेले एक मत पदवीधरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर परिणाम करू शकते. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणाऱ्या सुधाकर कोहळे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

विद्यमान पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात पदवीधरांच्या प्रश्नांवर ठोस काम झाल्याचे दिसून आले नाही. आंदोलन पलीकडे जाऊन सभागृहात पदवीधरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. मागील निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करून विजय मिळविल्याचा आरोप करत, आता निवडणुकीत पराभवाची शक्यता दिसू लागल्याने जातीयवादाचा मुद्दा पुढे केला जात असल्याचे ते म्हणाले.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्याचा उल्लेख करत बावनकुळे यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आमदार जोरगेवार हे कर्तृत्ववान असून, त्यांच्या आवाहनाला पदवीधरांनी साथ दिल्यास पदवीधरांचे प्रश्न संबंधित पदवीधर आमदारांच्या माध्यमातून शासनदरबारी मांडून ते सोडविण्यासाठी ते सक्षमपणे प्रयत्न करू शकतात, असे ते म्हणाले. त्यामुळे सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदवीधर मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसकडून ईव्हीएम आणि अन्य मुद्द्यांवरून संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, ज्या वेळी निवडणुकीत विजय मिळतो, त्याच वेळी ईव्हीएमबाबतची भूमिका बदलताना दिसते. निवडणूक प्रक्रियेबाबत पक्षाकडून घेतली जाणारी भूमिका सोयीस्कर असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआरच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यास एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जातात; मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या ठिकाणी याच प्रक्रियेबाबत वेगळी भूमिका घेतली जाते, असा आरोप करत विरोधकांच्या या दुहेरी भूमिकेवर त्यांनी टीका केली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.

 पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची संधी आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करावे, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

विरोधकांचे कितीही झाले मेळावे अन् सोहळे, तरी निवडून येणार सुधाकर कोहळे – आ. किशोर जोरगेवार

 “विरोधकांचे कितीही झाले मेळावे आणि सोहळे, तरी निवडून येतील सुधाकर कोहळे! कारण निवडणूक प्रमुख आहेत चंद्रशेखर बावनकुळे, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहप्रमुख आहेत अनिल सोले, म्हणून निवडून येतील सुधाकर कोहळे!”

   या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कवितेने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये