ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगावराजात चोरट्यांचा धुमाकूळ

घरफोडी, टायर दुकान फोडून १ लाखांचा मुद्देमाल लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री घरफोडी, दुकानफोडी आणि बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिंगणे नगर येथील एका घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्याचवेळी जालना रोडवरील सिंदखेडराजा चौफुलीजवळील टायर दुकानाचे शटर उघडून तेथून २५ हजार रुपये रोख चोरून नेण्यात आले. याशिवाय बंधन बँकेतही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांत नोंदविण्यात आली असून, या सर्व घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कायम गुन्हा क्रमांक ३०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंगणे नगर, देऊळगाव राजा येथील रहिवासी गजानन माधवराव बुधवत (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते ८ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बुधवत यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून सुमारे तीन ग्रॅम वजनाची जुनी सोन्याची अंगठी, चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील वेल, तीन ग्रॅम वजनाची कानातील दोन फुले तसेच २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

याच तक्रारीत गजानन सिताराम भाग्यवंत, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा यांच्या जालना रोडवरील सिंदखेडराजा चौफुलीजवळ असलेल्या शिवांश टायर्स या दुकानातही चोरी झाल्याचा उल्लेख आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला आणि गल्ल्यात ठेवलेली २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. त्यामुळे घरफोडी आणि दुकानफोडी मिळून एकूण १ लाख रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, याच साखळीत बंधन बँकेतही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्व घटना एकाच टोळीने घडवून आणल्या का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. सलग घडलेल्या या प्रकारांमुळे देऊळगाव राजा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था, गस्त आणि संशयितांच्या हालचालींवर पोलिसांनी अधिक बारीक लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

ही तक्रार ८ जुलै रोजी दुपारी ३.५७ वाजता नोंदविण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ. विश्वनाथ काकड यांनी केली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि चोरीच्या पद्धतीचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये