बंद पडलेल्या सौरऊर्जेमुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना त्रास
पोंभुर्णा तालुक्यातील काही अंगणवाडी केंद्रांची अवस्था; दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, काही गावांमधील अंगणवाडी केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने तेथील चिमुकल्या बालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सौरऊर्जा यंत्रणा बंद असल्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रकाशाची समस्या निर्माण झाली असून, लहान मुलांच्या दैनंदिन उपक्रमांवर त्याचा परिणाम होत आहे. संबंधित यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करून ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फोनला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये लहान बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण महत्त्वाचे असताना मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. त्यामुळे बंद पडलेल्या सर्व सौरऊर्जा यंत्रणांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नियमित वीज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



