नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व डीजे चालक-मालकांची बैठक संपन्न
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आगामी नवरात्र उत्सव तसेच इतर सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करणे या उद्देशाने वर्धा जिल्ह्यातील ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायर, डीजे व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे चालक व मालक यांची बैठक सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीस पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. सुनिल महाडीक, ठाणेदार वर्धा शहर, सेवाग्राम व रामनगर, सावंगी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सहायक पोलिस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा तसेच जिल्ह्यातील डीजे व ध्वनीक्षेपक चालक-मालक उपस्थित होते.
झालेल्या यापूर्वी दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ध्वनीक्षेपक व डीजे चालक-मालकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले होते. तथापि, गणेशोत्सवाच्या कालावधीत हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनी प्रदूषणासंदर्भात दोन गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर संबंधितांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००, मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालयाचे आदेश, मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांचे दि. १७.०९.२०२६ अन्वये ध्वनी प्रदुषण नियमाचे पालन बाबत व लेझर लाईट प्रतिबंध आदेश जारी करण्यात आला आहे व कलम ३६ व ३८(१) मपोका नुसार दि. १९.०९.२०२६ अन्वये आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीदरम्यान ध्वनीक्षेपक व डीजे चालक-मालकांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या :-१.
ध्वनीक्षेकाचा वापर विहित ध्वनीमर्यादेत आणि शासनाने निर्धारित केलेल्या वेळेतच करावा.
२. आवश्यक त्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानग्या प्राप्त केल्याशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये.
३. शांतता क्षेत्र, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये तसेच इतर संवेदनशील ठिकाणांच्या परिसरात विशेष दक्षता घ्यावी.
४. ध्वनीची तीव्रता वाढविण्यासाठी अतिरिक्त किंवा नियमबाह्य साउंड सिस्टीमचा वापर करू नये.
५. वाहनांवर ध्वनीक्षेपक व इतर उपकरणे बसविताना वाहनाची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
६. नागरिकांना त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पद्धतीने ध्वनीक्षेपक, डीजे व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करू नये.
७. ध्वनी प्रदूषणासंबंधी लागू असलेल्या नियमांचे, न्यायालयीन निदेशांचे आणि प्रशासकीय आदेशांचे काटेकोर पालन करावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बैठकीदरम्यान देण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व सण-उत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिक, उत्सव मंडळे तसेच डीजे व ध्वनीक्षेपक चालक-मालकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा वर्धा



