कोरपनाच्या आरोग्य व्यवस्थेला महिला शक्तीचा आधार!
नवरात्री विशेष : महिला डॉक्टरांसह ३६ आरोग्य सेविकांच्या खांद्यावर आरोग्यसेवेची धुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : रुग्णसेवेचा वसा आणि आरोग्यरक्षणाचा ध्यास घेऊन कोरपना तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमपणे सांभाळण्यात महिला डॉक्टर आणि आरोग्य सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. नवरात्रीच्या पर्वात शक्तीच्या विविध रूपांची आराधना केली जात असताना, रुग्णसेवेतून समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या महिला म्हणजेच आरोग्य व्यवस्थेतील ‘आरोग्य दुर्गा’ आहेत.
कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. तेजस्विनी टिपले आणि डॉ. बादल खैरे कार्यरत आहेत. मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शालिनी तरोने, डॉ. तझिन सय्यद आणि डॉ. नाहीदा सिद्दिकी रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळत आहेत. कवठाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सरला रंगारी, नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. स्नेहल ठाकरे, तर नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. दीक्षा ताकसांडे आरोग्यसेवा देत आहेत.
कोडशी बुज येथील आयुर्वेदिक दवाखान्यात डॉ. कल्याणी ठाकरे, वनसडी येथील आयुर्वेदिक दवाखान्यात डॉ. हेमा सोनकुसरे, कोरपना येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे डॉ. मानसी राखुंडे, तर परसोडा येथे डॉ. सुमेधा खोब्रागडे आरोग्यसेवेची धुरा सांभाळत आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णांवर उपचार करणे, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविणे, माता-बाल आरोग्याची काळजी घेणे आणि विविध आजारांबाबत जनजागृती करणे, अशा विविध जबाबदाऱ्या या महिला डॉक्टर पार पाडत आहेत. आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.
३६ आरोग्य सेविकांची मोलाची साथ
तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला बळ देण्यासाठी ३६ आरोग्य सेविका कार्यरत आहेत. गावागावांत आरोग्यविषयक जनजागृती, लसीकरण, माता-बाल संगोपन, आरोग्य तपासणी आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक पातळीवर नागरिक आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील दुवा म्हणून त्या काम करतात.



