स्मार्ट मीटरच्या त्रासामुळे नागरिक संतप्त; राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची नागरिकांनी घेतली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणघाट – स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढीव वीजबिल, वीजपुरवठा खंडित होणे तसेच तांत्रिक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या.
विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी स्मार्ट मीटरमुळे आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी नागरिकांनी सांगितले की, पूर्वीच्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठी वाढ होत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. तसेच रिचार्ज संपल्यानंतर वीजपुरवठा तात्काळ खंडित होणे, तांत्रिक बिघाड, मीटरच्या अचूकतेबाबत निर्माण झालेले प्रश्न आणि ग्राहकांना पुरेशी माहिती न मिळणे यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.शासनाने स्मार्ट मीटर योजनेतील त्रुटी दूर करून ग्राहकांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात तसेच वाढीव वीजबिल व तांत्रिक अडचणींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली.
….*प्रतिक्रिया*….
*अतुल वांदिले, वर्धा जिल्हाध्यक्ष,* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार
“स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट सुरू असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्ष शांत बसणार नाही. वाढीव वीजबिल, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि तांत्रिक त्रुटींमुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. ही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.शासन आणि महावितरणने आठ दिवसांच्या आत स्मार्ट मीटरसंदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, वाढीव वीजबिलांची चौकशी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा.
जर आठ दिवसांत नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या नाहीत, तर सतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन, महावितरण विभागाची असेल.



