ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिधोरा धरणात बुडून दोघांचा मृत्यू

मद्यधुंद अवस्थेत आंघोळीसाठी उतरले; वर्धा शहरातील चार मित्रांपैकी दोघांचा दुर्दैवी अंत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलिस स्टेशन सेलू येथील पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत…

वर्धा तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या वर्धा शहरातील चार मित्रांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील ओम वरठी (वय ३८, रा. सावजी नगर, वर्धा), राकेश (वय ३४, रा. आदिवासी कॉलनी, वर्धा), प्रवीण हिवसे (रा. गजानन नगर, वर्धा) आणि चंदू मेश्राम (रा. सावजी नगर, वर्धा) हे चौघे मित्र आज दुपारी रिधोरा धरण परिसरात मौजमजा करण्यासाठी आले होते. यावेळी मद्यधुंद अवस्थेत त्यांनी धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ओम वरठी व राकेश हे दोघे खोल पाण्यात बुडाले. यावेळी घाबरलेल्या त्याच्या मित्रानी रिधोरा गावात जाऊन दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी सेलू पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागरिकांनी धरणे, तलाव किंवा नदी परिसरात मद्यधुंद अवस्थेत जाणे तसेच पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये