सत्यशोधक कट्ट्यात शिवराज्याभिषेक आणि शाहू महाराजांच्या विचारांचा जागर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सिंदी मेघे (वर्धा) : महात्मा फुले द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सत्यशोधक कट्टा उपक्रमाचे सोळावे पुष्प सिंदी मेघे येथील पवनसूत हनुमान मंदिर, न्यू रेल्वे कॉलनी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जयहिंद मित्र मंडळ जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक, सामाजिक समता आणि परिवर्तनवादी विचारांवर अभ्यासपूर्ण मंथन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी तुषार जोगी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत्यशोधक कट्ट्याची संकल्पना, समाजप्रबोधनातील त्याची भूमिका आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते चंद्रकांत वानखेडे यांनी “शिवराज्याभिषेक” या विषयावर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्या काळातील सनातनी व्यवस्थेकडून झालेल्या विरोधाचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
बीजभाषणात रमेश बिजेवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक समतेसाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. “शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळेच त्यांना ‘लोकराजा’ म्हणून ओळखले जाते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना सातव यांनी केले, तर आभारप्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश देठे, चंद्रशेखर इंगोले, अनिल गावंडे, खुशाल राऊत, तुषार जोगी, योगिता जोगी, अंजली गावंडे तसेच हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
समाजप्रबोधन, इतिहासाचे चिकित्सक आकलन आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सत्यशोधक कट्टा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला.



