ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

४थी राज्यस्तरीय बुद्ध-भीमगीत स्पर्धा उत्साहात संपन्न

१४ तास चाललेल्या सुरांच्या महासंग्रामात कलावंतांची बहारदार गीते!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक ‘अश्वघोष सांस्कृतिक कला मंच, वर्धा’ च्या वतीने आयोजित चौथी राज्यस्तरीय बुद्ध-भीमगीत गायन स्पर्धा नुकतीच प्रचंड उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. मंचाचे अध्यक्ष व संकल्पक मा. धनंजयजी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेने सलग चौथ्या वर्षीही यशाचे शिखर गाठले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० हून अधिक गायकांनी एकापेक्षा एक सरस भीमगीते सादर करून वर्धेकरांना मंत्रमुग्ध केले.

थाटात उद्घाटन आणि शिस्तबद्ध नियोजन

स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मोहनभाऊ राईकवार यांच्या हस्ते व इंजिनिअर हरीषजी डोंगरे, यशवंतजी म्हात्रे आणि आयोजक धनंजय नाखले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेळेवर व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. राज्यभरातून निवड समितीने निवडलेल्या १७५ स्पर्धकां पैकी ६० गुणवंत स्पर्धकांनी या १४ तास चाललेल्या सुरांच्या महासंग्रामात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपली कला सादर केली.

दिव्यांग स्पर्धकांना विशेष सवलत व ‘शाहू महाराज’ पुरस्कारांचे वितरण

या वर्षीच्या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग स्पर्धकांसाठी ५०० रुपये प्रवेश फी पूर्णपणे माफ करण्यात आली होती, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात व दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रांतील यशस्वी विद्यार्थी, गुणवंत कलाकार आणि नामवंत समाजसेवकांचा ‘राज्यस्तरीय लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टॉप-१२ मधील चुरस आणि पारितोषिक वितरण

अंतिम फेरीत पोहोचलेल्या ‘टॉप १२’ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी अटीतटीची चुरस पाहायला मिळाली. अंतिम विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

प्रथम क्रमांक: कु. रक्षिका मेश्राम (अमरावती) – रोख ₹२५,०००

द्वितीय क्रमांक: कु. भाग्यश्री खानोदे (यवतमाळ) – रोख ₹१५,०००

तृतीय क्रमांक: शाम शिंदे (पांढरकवडा) – रोख ₹१०,०००

उर्वरित ९ स्पर्धकांना प्रत्येकी ₹२,००० याप्रमाणे एकूण ₹१८,००० ची प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

‘अश्वघोष’ परिवाराचे अहोरात्र परिश्रम हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय नाखले यांच्या खांद्याला खांदा लावून प्रकाशभाऊ जिंदे आणि संजयभाऊ मोडक यांनी अद्वितीय कामगिरी केली. तसेच राजूभाऊ थुल, गौतम पाटील, रमेश जोगे, डॉ. मिरगे, प्राचार्य मुन्ना नाखले, सोना राहुल पाटील, निरजभाऊ गुजर, रविभाऊ गणवीर, प्रभा जिंदे, नलिनी नाखले, अर्चना नाखले, शैलेश निकोसे, विजय लोखंडे आणि किशोर नारे या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. वाद्यवृंदांची उत्कृष्ट साथ, परीक्षकांचे अचूक परीक्षण आणि साहिल दरणे यांच्या बिनधास्त व दर्जेदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

तरुण कलाकार भूमिका भगतला भावपूर्ण श्रद्धांजली गत १४ एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर काल दुःखद निधन झालेली तरुण कलाकार भूमिका भगत हिच्या निधनाची वार्ता समजताच, अश्वघोष सांस्कृतिक मंचाच्या वतीने संपूर्ण सभागृहाने उभे राहून तिला भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये