जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम उत्साहात
राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून लसीकरणची पाहणी व बालकांना डोस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ५ वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले होते.
या मोहिमेच्या अंमलबजावणीची आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी डॉ.सचिन तडस यांनी आज जिल्ह्याला भेट दिली. डॉ.तडस यांनी पिंपरी (मेघे) व त्यासमोरील परिसरातील मोबाईल टीमच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विशेषत्वाने वीटभट्टी भागाला प्रत्यक्ष भेट दिली. स्थलांतरित व दुर्गम भागातील बालकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या उद्देशाने डॉ.तडस यांनी वीटभट्टीवरील कामगारांच्या बालकांना स्वतः पोलिओचे डोस पाजले आणि मोहिमेच्या गुणवत्तेची खात्री केली.
या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मंगेश रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्रांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले आणि मोहिमेचा एकही लाभार्थी सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नागरिक व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आरोग्य विभागाच्या विविध पथकांमार्फत सायंकाळपर्यंत ही मोहीम अविरतपणे सुरू होती.



