ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ; केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

काँग्रेसची न्यायालयीन चौकशी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये सातत्याने होत असलेल्या पेपरफुटी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. NEET, रेल्वे, शिक्षक, पोलीस, सैन्य भरती तसेच विविध राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले असल्याचे यंग रेस्टारंट, चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसने म्हटले आहे.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा शहर अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, प्रदेश सचिव रोशनलाल बिट्टू, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर यु. काँ. अध्यक्ष राजेश अडुर, एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष शपाक शेख, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, महिला शहर जिल्हा अध्यक्ष चंदा वैरागडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, मनीषा तिवारी, नरेश मुंदडा, रामकृष्ण कोंडरा, यश दत्तात्रय यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नीट परीक्षेतील गोंधळ आणि फेरपरीक्षेच्या तणावामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये १४ हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच NEET पुनर्परीक्षेसाठी अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र चुकून अबुधाबी (UAE) येथे देण्यात आले होते, तर लाठी येथील वैष्णवी सुरेश लोखंडे या विद्यार्थिनीला पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र न मिळाल्याने ती परीक्षेपासून वंचित राहिल्याने ती मानसिक तणावग्रस्त आहे. या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.

आज सीडीसीसी बँक सभागूह येथे आयोजित “छात्रो की गुंज” सम्मेलनात जिल्हातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न, वेदना, व्यथा मांडल्या. यावेळी राजस्थानमधील कोटा येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली या कार्यक्रमाचे प्रेझेंटेशन दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच नीट परीक्षा घोटाळ्यांमध्ये विविध राज्यांतील अनेक व्यक्तींची नावे तपासादरम्यान समोर आली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एमपीएससी परीक्षांच्या निकालांतील प्रादेशिक असमतोलाबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने NEETसह सर्व परीक्षा घोटाळ्यांची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, दोषींवर कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटले चालवावेत, राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व पारदर्शक परीक्षा यंत्रणा स्थापन करावी तसेच प्रभावित विद्यार्थ्यांना आवश्यक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नसून, केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर काँग्रेस पक्ष विद्यार्थी-युवकांसह लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारेल, असा इशारा चंद्रपूर काँग्रेसने दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये