ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमध्ये परप्रांतीय ठेकेदारावर मनमानीचा आरोप

प्रभागातील नागरिकांची नगर परिषदेकडे कठोर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट

घुग्घूस :_ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील अमराई उडिया मोहल्ला येथील नागरिकांनी एका परप्रांतीय ठेकेदाराविरोधात नगराध्यक्षांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदार गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जाणीवपूर्वक अरुंद रस्त्याने जड वाहनांची वाहतूक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, मोठ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही हा मार्ग वापरला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदार १० ते १२ परप्रांतीय मजुरांसह प्रभागात वास्तव्यास असून, वारंवार जड वाहने अरुंद गल्लीतून नेल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे गल्लीत खेळणारी लहान मुले, महिला तसेच घरासमोर उभी असलेली दुचाकी व चारचाकी वाहने यांना सतत अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रभागातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, संबंधित व्यक्तीला अनेकदा समज देऊनही त्याच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला नाही. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. वेळेत प्रशासनाने हस्तक्षेप केला नाही, तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात संबंधित व्यक्तीविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची तसेच भविष्यात कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक नागरिकांना अशा प्रकारे त्रास होणार नाही, याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून प्रशासनाने एक आदर्श निर्माण करावा, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारची मनमानी करण्याचे धाडस करणार नाही, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप नगर परिषदेची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये