तोहोगावमध्ये आरओ पाण्याच्या दरवाढीवरून नागरिकांमध्ये संताप
२० लिटर पाण्याचा दर ५ वरून १० रुपये; निर्णयाविरोधात ग्रामस्थांची दर पूर्ववत करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील तोहोगाव ग्रामपंचायतीच्या आरओ पिण्याच्या पाणी प्रकल्पातील २० लिटर पाण्याचा दर ५ रुपयांवरून थेट १० रुपये करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही दरवाढ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व संबंधित समितीला विश्वासात न घेता करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पिण्याच्या पाण्याच्या दरात वाढ करण्यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. दरवाढीची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामपंचायत सचिवांची भेट घेऊन पूर्वीप्रमाणे २० लिटर पाण्यासाठी ५ रुपये दर कायम ठेवण्याची मागणी केली. मात्र, या मागणीला १५ दिवस उलटूनही कोणताही निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पिण्याचे शुद्ध पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून, सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवाढीमागील कारणे ग्रामपंचायतीने जाहीर करावीत तसेच पदाधिकारी व संबंधित समितीशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
मला व ग्रामपंचायत प्रशासक समितीला याबाबत कसलिहि कल्पना दिली नाही. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमर्जीने आरओ पाण्याची दरवाड केली, ती समितीला मान्य नाही. मासिक सभेमध्ये या विषयावर ठराव घेऊन दरवाढ कमी करायला लावू.
_*अमावस्या रतिधर ताडे,प्रशासक सरपंच, तोहोगाव*


