राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २८ जून रोजी मनपा कार्यक्षेत्रात आयोजित
३३,१२८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्याचे नियोजन

चांदा ब्लास्ट
पोलिओ रोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या उद्देशाने भारतात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. जानेवारी २०११ पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – South-East Asia Region) वतीने भारताला दिनांक २७ मार्च २०१४ रोजी पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. तथापि, संपूर्ण जगातून पोलिओचे निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
यावर्षी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राबविण्यात येणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ जून २०२६ रोजी सिटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाजमंदिरे, अंगणवाड्या, दवाखाने आदी ठिकाणी एकूण १५२ तात्पुरती लसीकरण केंद्रे (बुथ) स्थापन करण्यात येणार आहेत. या बुथची वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार आहे.
प्रवासात असलेली, स्थलांतरित तसेच निवासाची व्यवस्था नसलेली बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी २० मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक, मेळावे आदी गर्दीच्या ठिकाणी ३१ ट्रान्झिट पथकांमार्फत पोलिओ लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ३३,१२८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या बालकाला यापूर्वी पोलिओचा डोस दिलेला असला तरी, बालक किरकोळ आजारी असले तरी किंवा नुकतेच जन्मलेले असले तरीही त्याला पोलिओचे दोन थेंब पाजणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे गरजेचे आहे.
तरी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना दिनांक २८ जून २०२६ रोजी जवळच्या पोलिओ बुथवर घेऊन जाऊन पोलिओ लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.



