अवैध कॉटन जीनिंगविरोधात ग्रामपंचायतचा आक्रमक पवित्रा
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चक विठ्ठलवाडा (तांडा) येथे परवानगी व आवश्यक व्यवसाय प्रमाणपत्र न घेता सुरू असलेल्या कथित अवैध कॉटन जीनिंग व्यवसायावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोरंबी ग्रामपंचायतने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी अष्टविनायक कॉटेक्स जिनिंगचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोणतीही आवश्यक परवानगी न घेता कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. सन २०२४-२५ मध्ये बांधकाम करण्यात आले असून अद्याप व्यवसायासाठी आवश्यक परवाने व ग्रामपंचायतीचे व्यवसाय प्रमाणपत्र घेतलेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने यापूर्वीही या संदर्भात संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतरही नियमांचे पालन न करता व्यवसाय सुरूच असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
परवानगीशिवाय सुरू असलेल्या व्यवसायामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचे उल्लंघन होत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व व्यवसायाची तातडीने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडेही सोमवारी (२२ जून) करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि संबंधित व्यवसायावर काय कारवाई होते,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिनिंग उभी झाली व्यवसाय सुरू झाला. मात्र कुठलीच परवानगी ग्रामपंचायत कडून घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा कर बुडत आहे. तातडीने योग्य ती कारवाई करून कॉटन जिनिंग यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
*_नितेश मेश्राम (सदस्य, ग्रामपंचायत कोरंबी)*



