मृग नक्षत्र कोरडेच..! खरीप हंगाम धोक्यात..?
पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मृग नक्षत्र सुरू होऊन संपत आले तरीही जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्याने बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी पावसाचे थेंब मात्र जमिनीवर पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खरीप हंगामाची तयारी पूर्ण करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला आहे. शेतजमिनी तयार आहेत, बियाणे घरात पडून आहेत, मात्र पाऊस नसल्याने पेरणीचा मुहूर्त पुढे ढकलावा लागत आहे. परिणामी शेतीच्या नियोजनावर मोठा परिणाम होत असून आर्थिक चिंताही वाढत आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्याचप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातही अजूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.
“मृग नक्षत्रही कोरडेच..?” हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. हवामान खात्याने काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी सर्वदूर दमदार पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. सलग आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पावसाच्या प्रत्येक ढगाकडे आशेने पाहणारा बळीराजा आता एका चांगल्या सरीची आतुरतेने वाट पाहत आहे. आगामी काही दिवसांत मान्सून जोर धरतो की मृग नक्षत्राप्रमाणे पुढील नक्षत्र कोरडेच संपते, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.



