धाबा_गोंडपिपरीसह सोनापूर_कोठारी रस्ता दुरुस्तीची मागणी
तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा ; काँग्रेस पक्षातर्फे बांधकाम विभागाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा–गोंडपिपरी मुख्य मार्गावरील धामणपेठ_वटराणा_गोजोली या गावांच्या जंगल क्षेत्रातील अरुंद रस्त्याची रुंदी वाढवून साईट भरून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका काँग्रेस कमिटी, गोंडपिपरी यांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना उपविभागीय अभियंता यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, धाबा–गोंडपिपरी हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच विविध प्रकारची वाहने प्रवास करीत असतात.
मात्र या मार्गावरील जंगल क्षेत्रातील अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस आवश्यक साईट भरणा करण्यात आलेले नाही. त्यामुळे समोरासमोर येणाऱ्या वाहनांना साईड देताना वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला घसरण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
याचप्रमाणे सोनापूर–कोठारी मार्गाचीही अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित व सोयीस्कर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील धाबा_गोंडपिपरी आणि सोनापूर_कोठारी या मार्गावरील समस्यांवर तात्काळ कार्यवाही करून नागरिकांच्या जीवितांचे संरक्षण करावे, अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष अशोक रेचणकर, शहराध्यक्ष राजू झाडे, ज्येष्ठ नेते अजय माडुरवार, अनिल झाडे, बाजार समितीचे संचालक संतोष बंडावार, अनुसूचित जाती सेल तालुकाध्यक्ष सारनाथ बक्षी, ओ बी सी सेल तालुकाध्यक्ष महेंद्र कुणघाटकर, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रफीक शेख, सोशल मीडिया प्रमुख राजेश डोंगरे, सचिन जंपलवार, शेषराव बट्टे यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
*मुख्य समस्या*
*अनेक ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
*सोनापूर–कोठारी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
*साईट भरण नसल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना साईड देताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
*जंगल क्षेत्रात सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव आहे.
*नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
*संबंधित विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
*प्रमुख मागण्या*
*धाबा–गोंडपिपरी मार्गाचे तात्काळ सर्वेक्षण करण्यात यावे.
*जंगल क्षेत्रातील अरुंद भागात रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी.
*रस्त्याच्या दोन्ही बाजूस आवश्यक साईट भरण करण्यात यावे.
*धोकादायक ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्यात यावेत.
*सोनापूर–कोठारी मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित व सुकर करण्यात यावे.



