“मुसीबत हजार _११२ हर बार”
चंद्रपूर पोलीस विभागाची सोशल मीडियावर जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ संकट किंवा आणीबाणीच्या प्रसंगी मदत मिळवण्यासाठी ११२ हा सर्वसमावेशक टोल-फ्री क्रमांक असून याद्वारे पोलिस, अग्निशनक दल आणि रुग्णवाहिका (आरोग्य विभाग) या प्रमुख आपत्कालीन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. हा नंबर २४ तास उपलब्ध असून याद्वारे जीपीएसच्या साहाय्याने कॉल करणाऱ्याचे अचूक स्थान शोधून काही मिनिटांत मदत पोहोचवली जाते.
याबाबत अधिक व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलीस विभागाने सोशल मीडियावर “मुसीबत हजार _ ११२ हर बार”चा संदेश प्रसारित करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलिस विभागाकडून खून, मारामारी, चोऱ्या, अपघात, महिला व बालकांवरील अत्याचार किंवा धडक कारवाई अशा प्रकरणात ११२ या नंबरचा वापर केल्यास तात्काळ मदतीची अपेक्षा असते आणि ती पूर्णही केल्या जाते.
आरोग्य व वैद्यकीय सेवेच्या बाबतीत गंभीर अपघात किंवा आजारपणात तातडीने रुग्णवाहिका (अम्बुलन्स) उपलब्ध करून रुग्णाचे जीव वाचविण्यास मदत केली जाते. तसेच आगीची दुर्घटना (अग्निशमन दल) आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळीसुद्धा मदत घेतली जाते.
११२ हा नंबर मोबाईल किंवा लँडलाईनवरून कधीही, कुठेही मोफत डायल करता येतो. तसेच स्मार्टफोनवर ११२ इंडिया ॲप (११२ India App) द्वारे किंवा पॉवर बटण ३ वेळा दाबून पॅनिक एसओएस (SOS) अलर्ट पाठवता येतो. चंद्रपूर पोलीस विभागाच्या सोशल मीडियारील या अभिनव प्रयोगाचे सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे.
*पोलीस आणि आरोग्य विभागाची कार्यवाही*
*कॉल रिसिव्हिंग आणि मूल्यांकन*: ११२ वर कॉल केल्यावर तो कॉल मुख्य आदेश आणि नियंत्रण कक्षात (Command and Control Centre) पोहोचतो. तेथील अधिकारी कॉलचे गांभीर्य आणि स्वरूप तपासतात.
*लोकेशन ट्रॅकिंग*: कॉलरचे जीपीएस (GPS) लोकेशन संगणक प्रणालीद्वारे शोधले जाते.
*डिपॅच (Dispatch)*: कॉम्प्युटर एडेड डिस्पॅच (CAD) प्रणालीद्वारे घटनेच्या सर्वात जवळ असलेल्या पोलिस वाहन (ERU) किंवा रुग्णवाहिकेला वायरलेसवरून त्वरित आदेश दिले जातात.
*घटनास्थळी मदत*: संबंधित वाहन काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून नागरिकाला तातडीने सुरक्षा किंवा वैद्यकीय साहाय्य प्रदान करते.



