देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करुन जनतेला न्याय देणार -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
देवळी येथे पालकमंत्र्यांच्या जनसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
प्राप्त तक्रारींवर महिनाभरात कारवाई करण्याचे निर्देश
वर्धा : केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारल्याशिवाय येथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित भव्य जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, सुनिल गफाट, मिलींद भेंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.भोयर यांनी केले. इतकी वर्षे काम करूनही मोठ्या संख्येने लोक समस्या घेऊन प्रशासनासमोर येत असतील, तर ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. आज येणारी सर्व निवेदने एक महिन्याच्या आत निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
राज्य सरकारच्या सर्व योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आमदार बकाने यांनी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात जाऊन घेतलेल्या परिश्रमामुळे आज सुमारे दोन हजार नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरांचे पट्टे मिळाले आहेत, ही मोठी फलश्रुती आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच पट्टे मिळवून दिले जातील, असे पालकमंत्री म्हणाले.
*पात्र नागरिकांना पट्टे वाटप करावे – आ.राजेश बकाने*
आमदार राजेश बकाने यांनी मतदारसंघातील विविध समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील नागरिकांची रस्ते आणि पांदणीची सातत्याने मागणी असते. त्यामुळे देवळी मतदारसंघातील अधिकाधिक पांदणी मंजूर करण्यासह रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करून द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच अतिक्रमण नियमानुकूल करण्यातील तांत्रिक अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला. मतदारसंघात अनेक ठिकाणी झुडपी जंगल जमिनीवर गरिबांची अतिक्रमणे आहेत. यातील काही २०११ पूर्वीचे पुरावे असलेल्या उर्वरित सर्व नागरिकांना पुढील दोन महिन्यांत पट्ट्यांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी आ.बकाने यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अप्पर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर यांनी केले.
*पालकमंत्र्यांचा निवेदनकर्त्यांशी आत्मियतेचा संवाद*
पालकमंत्र्यांचा जनसंवाद कार्यक्रमात २४ शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित आपली निवेदने आणि तक्रारी पालकमंत्र्यांकडे थेट सुपूर्द केल्या. पालकमंत्र्यांनी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत त्यांच्याशी आत्मियतेने संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच निवेदनांवर कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
*पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध लाभांचे वाटप*
कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आमदार राजेश बकाने यांचेहस्ते विविध शासकीय योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या १६ लाभार्थ्यांना आणि पुरवठा विभागामार्फत १२ जणांना नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच, ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमांतर्गत १४८ लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमानुकूल पट्ट्यांचे, तर ५० जणांना घरकुलाच्या चाब्यांचे वाटप करण्यात आले. कृषी व इतर पूरक घटकांसाठी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ५ लाभार्थ्यांना सलग तूर वाटप आणि २ जणांना पॅक हाऊसकरिता अनुदान देण्यात आले. यासोबतच, १० लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले.



