रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांनी घेतली नगरपरिषद व भूमि अभिलेखची संयुक्त बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महिनाभरात भूखंडधारकांना भोगवटदार वर्ग 1 चे पत्रके देण्याचे निर्देश
वर्धा : वर्धा शहरातील रामनगर येथील लिजधारकांचे भूखंड शासनाने फ्री-होल्ड केले आहे. याबाबत स्पष्ट शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व फ्री-होल्ड धारकांना भूमी अभिलेख विभागाने त्यांच्या भूखंडाच्या मालकी हक्काची मालमत्ता पत्रके तातडीने वितरीत करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
रामनगर येथील लिजधारकांचे भूखंड फ्री-होल्ड करून देखील त्यांना मालमत्ता पत्रक वितरणास विलंब होत होता. त्याअनुषंगाने समन्वयासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषद, महसूल, भूमि अभिलेख या विभागांच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले.
बैठकीला पालकमंत्र्यांसह वर्धा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक सुनील बन तसेच रामनगर येथील फ्री-होल्डधारक नागरीक उपस्थित होते.
रामनगर येथे अनेक नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लिज जमिनीवर वास्तव्य करत होते. या नागरिकांना लीज जमिनींचा कायमस्वरुपी हक्क मिळावा, त्यांना हक्काचा भूखंड उपलब्ध व्हावा म्हणून आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने रामनगर येथील लिजधारक नागरिकांचे भूखंड फ्री-होल्ड केले. वर्धा नगरपरिषदेच्यावतीने या भूखंडधारकांचे फ्री-होल्डचे आदेश देखील पारीत करण्यात आले आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
फ्री-होल्डधारकांना आता त्यांच्या भूखंडाचे मालकी हक्काचे मालमत्ता पत्रके उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाने येत्या महिनाभरात येथील 350 भूखंडधारकांचे भोगवटदार वर्ग-1 चे मालमत्ता पत्रके तयार करून वितरीत करावे. तसेच इतर सर्व प्रकरणे येत्या दोन महिन्यामध्ये निकाली काढून उर्वरीत भूखंडधारकांना देखील मालमत्ता पत्रके उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भूमि अभिलेख विभागाला दिले.
रामनगर येथील नागरिकांच्या अडचणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी निकाली काढाव्या, अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. लीज जमीन फ्री-होल्ड झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून मालमत्ता पत्रके उपलब्ध व्हावी, अशी मागणी रामनगर येथील नागरिक करीत होते. त्यामुळे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी नगर परिषद व भूमी अभिलेख यांच्यात समन्वय घडवून आणण्यासोबतच या कामास गती देण्यासाठी नगरपरिषद व भूमि अभिलेख विभागाची संयुक्त बैठक घेतली व आवश्यक निर्देश दिले. त्यामुळे मालमत्ता पत्रके वितरणाचा विषय मार्गी लागला आहे.



