जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त “बालकामगार मुक्त वर्धा” अभियानाचा शुभारंभ
रेल्वे स्टेशन परिसरातून जनजागृती मोहिमेला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ जून २०२६ रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वर्धा अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर्धा यांच्या माध्यमातून वर्धा रेल्वे स्टेशन येथे “बालकामगार मुक्त वर्धा” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानाचे उद्घाटन मा. श्रीमती तृप्ती चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा यांच्या हस्ते हिरवी रिबीन कापून करण्यात आले. सदर अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन बालकामगार विरोधी जनजागृती करण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभाग, कामगार विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल कल्याण समिती वर्धा, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस ठाणे तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांनी प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समिती वर्धाच्या अध्यक्ष अॅड. स्मिता बढीये होत्या. यावेळी बाल कल्याण समितीच्या सदस्या ममता बालपांडे, सरकारी कामगार अधिकारी सीमा शिंदे, वर्धा रेल्वे स्टेशनचे प्रबंधक पी. एन. झा, आरपीएफचे प्रभारी अधिकारी छेदिलाल कनोजिया, लोहमार्ग पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, दुकाने निरीक्षक अविनाश ढोके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, संरक्षण अधिकारी वैशाली मिस्कीन, विधी सेवा प्राधिकरणचे प्रतिनिधी श्रीकांत पवार, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे जिल्हा समन्वयक पियुष आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती तृप्ती चव्हाण यांनी बालकांनी मजुरीच्या कामात न अडकता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, शासनामार्फत बालकांसाठी विविध योजना उपलब्ध असून कोणत्याही अडचणीच्या वेळी महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. स्मिता बढीये यांनी रेल्वे स्टेशन परिसरात बालकांच्या सुरक्षिततेबाबत तसेच मानवी तस्करीसारख्या गंभीर विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. रेल्वे स्टेशन प्रबंधक पी. एन. झा यांनी बालकांप्रती संवेदनशीलतेने कार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
बाल कल्याण समिती सदस्या ममता बालपांडे यांनी जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळून येऊ नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांनी बालकामगारासंदर्भातील माहिती संबंधित विभागाला देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक यांनी बालकांच्या अधिकारांविषयी माहिती देत “चिमुकले हात मजुरीसाठी नसून शिक्षणासाठी आहेत” असा संदेश दिला. काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी, बालमजुरी, आरोग्य सेवा, शैक्षणिक मदत तसेच शोषणापासून संरक्षण मिळविण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या आपत्कालीन सेवेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
विधी सेवा प्राधिकरणच्या अॅड. कांचन महल्ले यांनी कायदेशीर मदतीसाठी विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाईल्ड हेल्प लाईनचे माधुरी शंभरकर, जयश्री निवल, शीतल घोडराव, अन्सार अली, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या आरती नरांजे, आरपीएफचे प्रधान आरक्षक नवीन नगराळे, आरक्षक शशिकांत कुमरे, योगेश कोल्हे, सहाय्यक उप पोलीस निरीक्षक मिश्रा तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे संतोष डोने, वैभव भांदककर, सुरज भगत, माधुरी थूल, कोमल जवादे, योगेश जडीये यांनी सहकार्य केले.



