चार दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा ठप्प; नगरपंचायतीच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त
विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :_ शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायतीच्या नियोजनशून्य व बेताल कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी केला आहे.
कावटवार यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की, शहरातील अनेक भागांत चार दिवसांपासून नळांना पाणी आले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना भटकंती करावी लागत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगरपंचायतीने वेळेत नियोजन केले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या तीन- चार वर्षांत नगरपंचायतीच्या कारभारावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मूलभूत सुविधांच्या बाबतीत उदासीनता दिसून येत असून पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप कावटवार यांनी केला.
शहरातील नागरिकांना तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, पाणीटंचाईची कारणे जाहीर करावीत आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपंचायतीने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.



