ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभूर्ण्यात विजेचा लपंडाव; शहरी-ग्रामीण भागातील नागरिक हैराण

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संताप; महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :_ तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही महावितरणकडून आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

बुधवारी (११ जून) रात्री ८ वाजल्यापासून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी (१२ जून) दुपारी १२ वाजेपर्यंत काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरी अनेक गावांमध्ये व परिसरात वीजपुरवठा अद्यापही विस्कळीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. थोडा वारा किंवा हलका पाऊस झाला तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

वीज दुरुस्तीची कामे योग्य नियोजनाशिवाय करण्यात येत असल्याने वारंवार पुरवठा बंद ठेवावा लागत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

 वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास दूरध्वनीला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. वीजबिल थकित राहिल्यास तत्काळ कारवाई केली जाते, मात्र दीर्घकाळ वीजपुरवठा बंद राहिल्यास ग्राहकांना समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचा सूर नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान, पोंभूर्णा विभागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत दुरुस्तीच्या कामांवर परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी तातडीने उपाययोजना करून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा.

– आशिष कावटवार, विरोधी पक्षनेता, नगरपंचायत पोंभूर्णा

पोंभूर्णा उपविभागाला १३२ केव्ही लाईनवरून थेट वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने मुलमार्गे चिरोली व बेंबाळ उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा करावा लागतो. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. १३२ केव्हीवरून थेट वीजपुरवठ्यासाठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली आहे.

– विक्रांत कंदीकुरवार, सहाय्यक अभियंता, महावितरण पोंभूर्णा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये