ग्रामीण वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचा शॉक
सक्तीच्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ; पोंभूर्णा तालुक्यात संतापाची लाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा : आधीच शेतीचे संकट, महागाई आणि वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना आता स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांचा फटका बसत असल्याचे चित्र पोंभूर्णा तालुक्यात दिसून येत आहे. महावितरणकडून जुन्या मीटरऐवजी बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांचा आकडा अचानक वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्राहकांच्या संमतीशिवाय किंवा पुरेशी माहिती न देता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वी ५०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान येणारे मासिक वीजबिल आता दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
स्मार्ट मीटर अतिवेगाने रीडिंग घेत असल्याने वीज वापरापेक्षा अधिक बिल आकारले जात असल्याची शंका ग्राहकांनी व्यक्त केली आहे. वाढीव बिलांमुळे महावितरणविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्राहकांच्या मते, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जनजागृती करण्यात आली नाही. तसेच वाढीव बिलांबाबत स्पष्ट स्पष्टीकरणही दिले जात नसल्याने संभ्रम वाढत आहे. याप्रकरणी महावितरणने तातडीने दखल घेऊन वाढीव बिलांची तपासणी करावी, स्मार्ट मीटरची तांत्रिक पडताळणी करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशाराही वीज ग्राहकांकडून देण्यात आला आहे. पोंभूर्णा तालुक्यात स्मार्ट मीटरचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला असून महावितरणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांची वीजबिले अचानक वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असून महावितरणने तातडीने चौकशी करून वाढीव बिलांना न्याय द्यावा, अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-आशिष कावटवार, नगरसेवक तथा गटनेता, नगरपंचायत पोंभूर्णा
स्मार्ट मीटर हे अचूक व पारदर्शक वीजमापनासाठी बसविण्यात येत आहेत. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्यास त्यांची सखोल तपासणी केली जाईल. नागरिकांनी शंका असल्यास महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा
-मंगेश येनूरकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण पोंभूर्णा



