नदी दुर्घटनेतील मृत युवकांच्या कुटुंबीयांची आ. जोरगेवार यांनी घेतली भेट
दुःखात सहभागी होत दिला धीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ अलीकडेच नदीत बुडून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत पाच युवकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या घुग्घूस येथील तन्मय पठाडे, रोहित बोबडे, सम्यक सोनटक्के, सनी असंपल्ली आणि नकुल केळझरकर यांच्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, नगर सेवक निरीक्षण तांड्रा, आशिष मासिरकर, बलराम डोडाणी, गणेश पिंपळकर, संतोष नुने, साजन गोहणे, मल्लेश बल्ला, नंदकिशोर यादव, स्वप्निल वाढई, महिला आघाडी शहर अध्यक्ष सुचिता लुटे, नगरसेविका मधू तिवारी, पुजा दुर्गंम, सुनिता पाठिल, मुक्ता धाबेकर, सुनिता गिवे, ओमेश आयु, करण नायर आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार यांनी शोकाकुल कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला. अल्पवयात आणि आयुष्याच्या उमेदीच्या काळात पाच मित्रांचे एकाच दुर्घटनेत निधन होणे ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे केवळ संबंधित कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण घुग्घूस शहर शोकसागरात बुडाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मृत युवकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा प्रशासकीय सहकार्य आवश्यक असल्यास त्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कुटुंबीयांच्या वेदना शब्दांत व्यक्त करणे अशक्य असून या कठीण प्रसंगात संपूर्ण समाजाने त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रशासनानेही भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी जनजागृती करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.



