भद्रावतीत आषाढी एकादशीनिमित्त जणू पंढरीच अवतरली
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सपत्नीक विठ्ठल-रखुमाईला अभिषेक : हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आषाढी एकादशीनिमित्त भद्रावती शहर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले. विठ्ठल मंदिर देवस्थान, किल्ला वॉर्ड व लोकमान्य विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापूजा, अभिषेक व भव्य शोभायात्रेत हजारो विठ्ठलभक्त सहभागी झाल्याने शहरात जणू पंढरीच अवतरल्याची अनुभूती भाविकांना आली.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांनी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक करून महापूजा केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुंडावार, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, रविंद्र शिंदे, सुष्माताई शिंदे आदी उपस्थित होते.
दुपारी तीन वाजता गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सुरक्षा नगर, भद्रावती ते गुरूनगर (चिचोरडी) दरम्यान भव्य संस्कार वारी काढण्यात आली. आकर्षक पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी तसेच विठ्ठल-रखुमाईच्या वेशातील बालकलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीचे भद्रावती नगर परिषदेतर्फे नगराध्यक्ष प्रफुल चटकी व मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी स्वागत केले.
शोभायात्रेत लोकमान्य विद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठातील विद्यार्थी, शिक्षक, विविध भजनी दिंड्या, झेंडा पथक, लेझीम पथक तसेच पाऊली नृत्य पथक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पोलीस प्रशासन व नगर परिषदेच्या सहकार्याने सोहळा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



