कार्यालयीन वेळेत अन्न पुरवठा विभाग कुलूपबंद
तहसीदारांनी दिले चौकशीचे आदेश ; पुरवठा विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह..? ; कनिष्ठ लिपिकाच्या कथित अरेरावीने रास्त भाव दुकानदार संतप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
भर दुपारी कार्यालय बंद केल्याने नागरिकांची गैरसोय
गोंडपिपरी :_ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सोमवार (दि. २०) घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुरवठा निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे कनिष्ठ लिपिक राजेंद्र ढोंगे यांच्याकडे रास्त भाव दुकानदार आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यासाठी कार्यालयात गेले असता कनिष्ठ लिपिकाची जबाबदारी असलेल्या ढोंगे यांनी कागद पत्रांवर स्वाक्षरी करण्यास थेट नकार देत कार्यालय कुलूपबंद केल्याचा आरोप रास्त भाव दुकानदारांनी केला आहे.
याप्रकरणी संबंधित दुकानदारांनी तहसीलदार शुभम बहाकर यांची भेट घेऊन संपूर्ण घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान तहसीलदारांनी दूरध्वनीवरून संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारल्याची माहिती आहे. तसेच पुरवठा निरीक्षन अधिकारी शैलेंद्र झोडापे यांना संपूर्ण घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित कर्मचारी कार्यालयात मद्य प्राशन करून येत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झाली नाही. मात्र कार्यालयीन वेळेत कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत येणे आणि नागरिकांशी अरेरावीची भाषा बोलणे हे अंत्यंत निंदनीय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
याच दरम्यान संबधित कर्मचारी दुपारच्या सुमारास चक्क पुरवठा विभागाचे कार्यालय कुलूप बंद करून घरी निघून गेल्याने दुकानदारासह नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अन्न पुरवठा कार्यालयात कागदपत्रांसाठी तालुक्यातील नागरिक वेळ व पैसा खर्च करून येत असतात. मात्र अशा अधिकाऱ्याच्या अरेरावी धोरणांमुळे नागरिकांसह रास्त भाव दुकानदारांना आल्या पावली माघारी परतावे लागले. त्यामुळे संबधित अधिकाऱ्याविषयी नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही कोणतेही कारवाई झाली नसल्याने संबंधित विभागात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न रास्त भाव दुकानदारांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे. पुरवठा विभागात नागरिकांशी होणारे कथित गैरवर्तन, कार्यालयीन शिस्त आणि कामकाजातील पारदर्शकता याबाबत आता वरिष्ठ प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
*चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष*
तहसीलदार शुभम बहाकर यांनी पुरवठा निरीक्षक शैलेंद्र झोडापे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अहवालातून नेमके काय समोर येते आणि संबंधितांवर कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे रास्त भाव दुकानदारांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
रास्त भाव दुकानदार व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशी अहवाल आल्यानंतर सदर अधिकाऱ्याची कारवाई करण्यात येईल.
शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी
पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही सर्व दुकानदार मागणी पत्रावर सह्या घेण्याकरिता पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून आजच आदेश दिलेल्या राजेंद्र ढोंगे यांच्याकडे गेलो, पण त्यांनी सही मारण्यास नकार दिला व कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले.
संदीप राऊत, रास्त भाव दुकानदार खराळपेठ
राशन कार्ड चे काम करण्यासंबंधी मी पुरवठा विभागातील राजेंद्र ढोंगे या अधिकाऱ्याकडे कामानिमित्त आलो, पण त्यांनी माझ्यासह लोकांचे कामे न करता कार्यालयाला कुलूप लावून दुपारी निघून गेले. त्यामुळे मला माघारी जावे लागले. सदर प्रकार तहसीलदारांच्या लक्षात आणून दिला आहे.
नीलकंठ मत्ते, माजी सरपंच, परसोडी



