बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याबाबत सुनावणीत सकारात्मक चर्चा
१०५ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीचा प्रश्न; दहा वर्षांच्या संघर्षाची दखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रथम अपिलीय अधिकारी आशिष उज्वलराव देशमुख यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली.
बोरधरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम मेश्राम, रा. उचेगाव, ता. दारव्हा, जि. यवतमाळ हे मागील दहा वर्षांपासून बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा सूक्ष्म अभ्यास करून सातत्याने संघर्ष करीत आहेत. संबंधित वरिष्ठ विभागांकडे लेखी तक्रारी, विनंती अर्ज तसेच विविध मागण्यांच्या माध्यमातून ते सातत्याने पाठपुरावा करीत असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांना कायदेशीर व प्रशासकीय स्वरूपात उत्तरे दिली जात आहेत.
याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्धा यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार आज रोजी दि. 10/सप्टेंबर 2026रोजी 1वाजता बोर व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक आशिष उज्वलराव देशमुख, प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक, कोयर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीदरम्यान बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या १०५ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या लेखी आदेशासह नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त यांच्या स्तरावरून झालेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने बोर प्रकल्पग्रस्तांच्या आठही गावांतील नागपूर व वर्धा जिल्ह्यातील हजारो गरीब प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या परिस्थितीचा विचार करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपासून सूर्योदय संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या संघर्षाची दखल घेत, आजच्या सुनावणीत सहाय्यक वनसंरक्षक देशमुख यांनी मोबदल्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत चर्चा केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या सुनावणीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम, राष्ट्रीय सल्लागार शंकर पानबुडे, राष्ट्रीय सहसचिव दिलीप राजेंद्र मेश्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आजच्या सकारात्मक चर्चेमुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



