धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ‘ज्ञानार्जन’
वर्गखोल्यांची अवस्था जीर्ण; छत व भिंतींमधून गळती, दुर्घटनेची भीती ; नवीन इमारतीसाठी पालकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती पंचायत समिती अंतर्गत खडकी रायपूर गट ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील काकबन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळ्यात छत व भिंतींमधून पाणी गळत असून, वर्गखोल्यांची दुरवस्था पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सन १९९१ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत सुमारे ४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची येथे मोठी कमतरता आहे. शाळेच्या जुन्या इमारतीची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती न झाल्याने इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे.
पावसाळ्यात छतामधून पाणी गळत असल्याने वर्गखोल्यांमध्ये ओलावा निर्माण होतो. काही ठिकाणी इमारतीचे भाग जीर्ण झाले असून सिमेंटचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. मुलांना दररोज अशा धोकादायक वातावरणात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
*दोन शिक्षकांवर ४६ विद्यार्थ्यांची जबाबदारी*
शाळेत सध्या केवळ दोन शिक्षक कार्यरत असून, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असतानाच शाळेच्या इमारतीची दुरवस्था हा आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाने पायाभूत सुविधा आणि शिक्षकांची उपलब्धता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
*नवीन वर्गखोल्यांची मागणी*
विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाने शाळेची तातडीने पाहणी करून धोकादायक इमारत निर्लेखित करावी आणि नवीन, सुरक्षित वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी व प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



