शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार मनोज कायंदे आक्रमक; दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफीला गतीची मागणी
सिंदखेडराजा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच पावसाअभावी सुकत असलेल्या खरीप पिकांना दिलासा देण्यासाठी वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्यास कृत्रिम पर्जन्य अर्थात ‘क्लाउड सीडिंग’चा प्रयोग राबवावा, अशी मागणी विधानसभा सदस्य आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी केली आहे.या मागणीसाठी आमदार कायंदे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याची, तर सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली.
यासंदर्भात आमदार कायंदे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सिंदखेडराजा मतदारसंघात यंदा अपेक्षित पर्जन्यमान झाले नसून, मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सोयाबीन, कापूस, तूर पिकांवर संकट
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने अनेक ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली असताना आता हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आमदार कायंदे यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर हवामान विभाग व संबंधित तज्ज्ञ संस्थांचा सल्ला घेऊन वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्यास सिंदखेडराजा मतदारसंघासह पावसाची आवश्यकता असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भागात कृत्रिम पर्जन्याचा प्रयोग तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, हवामान विभाग व संबंधित तज्ज्ञ संस्थांना आवश्यक निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा, कर्जमाफीच्या प्रश्नांवरही पाठपुरावा
दरम्यान, आमदार मनोज कायंदे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देऊन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आमदार कायंदे म्हणाले, “या कठीण काळात शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, बळीराजाच्या प्रत्येक अडचणीत आपण खंबीरपणे सोबत आहोत.”
दरम्यान, पावसाच्या खंडामुळे मतदारसंघातील शेतीसमोरील संकट अधिक गंभीर होण्यापूर्वी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासह राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा,यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच कृत्रिम पावसाचा प्रयोग करून सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी देण्याची मागणी केली . तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याची, तर सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली. “या कठीण काळात शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, बळीराजाच्या प्रत्येक अडचणीत आपण खंबीरपणे सोबत आहोत,”
मनोज नंदाताई देवानंद कायंदे, आमदार, मातृतिर्थ सिंदखेड राजा मतदार संघ.



