मांगलीत जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांची धाड : सात जण ताब्यात
१ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मांगली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करीत सात जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते तसेच तीन दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परी. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्तीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत मांगली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ काही इसम पैशांची बाजी लावून ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळताना सुरज राजू लवाडिया (३४, रा. बंराज तांडा), अंकुश जंगलू मडावी (३२, रा. मांगली), किशोर भगु भुक्या (३४, रा. बंराज तांडा), सुरज रामदेव कोटनाके (३५, रा. मांगली), वैभव मोहन बोडेकर (२७, रा. मांगली), कल्याण शंकर पठाडे (५५, रा. मांगली) आणि अजित शंकर शेट्टी (२७, रा. किल्ला वार्ड, भद्रावती) यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत आरोपींच्या अंगझडतीत तसेच जुगाराच्या डावाच्या मध्यभागी मिळून आलेली ८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व ५२ तास पत्ते जप्त करण्यात आले. यासोबतच हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (MH 34 CL 6462) किंमत ५० हजार रुपये, हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (MH 34 AQ 9612) किंमत ४० हजार रुपये आणि हिरो प्लेझर मोपेड (MH 34 CG 2534) किंमत ६० हजार रुपये, अशी वाहनेही पोलिसांनी जप्त केली. अशाप्रकारे कारवाईत एकूण १ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
ही कारवाई पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, देवानंद डुकरे, गोपाल आतकूलवार, खुशाल कावळे आणि नितीन आमटे यांच्या पथकाने केली. सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई भद्रावती पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.



