पोलीस सेवेतून सामाजिक कार्यानंतर आता सक्रिय राजकारणात एन्ट्री..!
भास्कर कुंदावार यांनी दर्शविली निवडणूक लढविण्याची इच्छा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ शासकीय नौकरी म्हटलं कि, दररोजची एक वेगळीच वाटचाल असते. विशेषतः शासकीय नोकरदार आपले कुटुंबीय, नोकरीचे काम यापलीकडच्या भानगडीत पडत नाहीत. पण हा सारे कर्तव्य पार पाडतांना समाजाप्रती आपले काही देणेघेणे आहे. हि जाणीव ठेवीत काही व्यक्तिमत्व आपली वेगळी ओळख निर्माण करीत सामान्यांत आपले स्थान निर्माण करतात. ते अनेकांना आपलेसे वाटतात.
भास्कर वामन कुंदावार हे अशापैकीच एक. गेली पस्तीस वर्ष पोलीस दलात नोकरी करतांना त्यांनी आपल्या कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासली. नुकतेच ते पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेत. सामाजिक सेवेच राजकारण हे प्रभावी माध्यम आहे. या भावनेतून त्यांनी आता सक्रिय राजरकारणात एंट्री करण्याचा निर्धार केला आहे.
गोंडपिपरी तालुका हि त्यांची कर्मभूमी राहिली आहे. अशात याच तालुक्यातून येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याचे संकेत त्यांनी दिले.
गोंडपिपरी येथे नुकतीच त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपली जन्मभूमी करंजी नसली, तरी करंजी हीच आपली कर्मभूमी असल्याची भावना कुंदावार यांनी व्यक्त केली. करंजीसह परिसरातील गावांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, असे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. नोकरी सांभाळून समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवत सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करताना नागरिकांच्या समस्या, परिसरातील गरजा आणि लोकांच्या अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते. याच अनुभवाच्या आधारावर आगामी काळात व्यापक स्तरावर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्याला राजकीय वाटचालीची जोड देत स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा मानस असल्याचे बैठकीतील वक्तव्यावरून दिसून येते.
सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केल्याने भास्कर कुंदावार यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात आणि निवडणुकीसंदर्भात पुढील कोणती रणनिती ठरवितात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंदावार यांनी व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सामाजिक कार्यातून मिळालेला लोकसंपर्क आणि नागरिकांचा प्रतिसाद यांचा विचार करून राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची त्यांची तयारी दिसून येत आहे. मात्र, कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविणार, कोणत्या प्रभागातून किंवा गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार,राजकीय याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
गेली पस्तीस वर्ष पोलीस दलात कर्तव्य बजावतांना मी सामाजिक मदतीची भावना कायम जोपासली. आता समाजसेवेसाठी पुन्हा एकदा नव्या इनिंगची सुरवात करण्याचा इरादा पक्का केला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील व करंजी परिसरातील नागरिकांनी आपणावर नेहमीच प्रेम केल आहे. भविष्यात त्यांचा हा जिव्हाळा कायम राहील हा विश्वास आहे.
*भास्कर वामन कुंदावार, सामाजिक कार्यकर्ते.



