ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी महाराज यात्रेतील कुस्ती दंगल ठरली आकर्षणाचे केंद्र; ७० वर्षांची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : श्री बालाजी महाराज संस्थानच्या वार्षिक यात्रेतील लळितोत्सवानिमित्त वैदू समाजाच्या वतीने गावकऱ्यांच्या सहकार्याने पारंपरिक जंगी कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले. सुमारे ७० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा वैदू समाजाने आजही जपली आहे. या कुस्ती दंगलीत विविध ठिकाणांहून आलेल्या पैलवानांनी सहभाग घेतला. विजेत्या पैलवानांना एकूण दोन ते चार लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे वितरित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कुस्ती आखाड्याचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. आखाड्यातील चुरशीच्या लढती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना, शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कुस्ती हा भारताच्या पारंपरिक खेळांपैकी एक असून, अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

आमदार मनोज कायंदे यांनी युवा वर्गाने व्यायामाला प्राधान्य देऊन अधिकाधिक संख्येने राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कुस्ती आखाड्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. व्यायामशाळा उभारणीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कुस्ती दंगल हा केवळ खेळाचा कार्यक्रम नसून गावातील एकोपा टिकवून ठेवणारा उपक्रम असल्याचे सांगितले. अशा आयोजनातून मुलांना खेळाची प्रेरणा मिळते आणि त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते. वैदू समाजाने सुरू ठेवलेली ही परंपरा यापुढेही कायम राहावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

दंगलीतील अंतिम कुस्ती मुख्याधिकारी अरुण मोकळ आणि संदीप नागरे यांच्या हस्ते लावण्यात आली. वाशिम येथील पैलवान विजय वारा आणि गंगापूर येथील पैलवान विशाल मागे यांच्यात झालेली ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. तब्बल एक तास चाललेल्या या कुस्तीत दोन्ही पैलवानांनी जोरदार झुंज दिली. अखेर पंचांच्या मध्यस्थीने दोन्ही पैलवानांना समान बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या लढतीचा प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला.

या कुस्ती दंगलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला पैलवानांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि कन्नड येथील महिला पैलवानांनी आखाड्यात उतरून आपले कौशल्य दाखवले. महिला कुस्तीपटूंच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

७० वर्षांची परंपरा जपत वैदू समाजाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कुस्ती दंगलीतून पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळाले. कुस्तीच्या चुरशीच्या लढती, महिला पैलवानांचा सहभाग आणि नागरिकांची उपस्थिती यामुळे यात्रेतील लळितोत्सवाला विशेष रंगत आली.

पोलीस प्रशासन यांनी विशेष सहकार्य केले, यावेळी उपनिरीक्षक, नितीन मिड, गवई साहेब, त्यांचे सर्व पथक यांनी आखाड्यामध्ये विशेष लक्ष देऊन सहकार्य केले आणि कार्यक्रम यशस्वीरिते पार पडला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये